विठो माझा लेकुरवाळा


              
विठो माझा लेकुरवाळा ।

विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।। १ ।।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।। २ ।।
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ।। ३ ।।
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।। ४ ।।
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ।। ५ ।।
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६ ।।

                जनाबाईने या अभंगातून लेकुरवाळ्या विठ्ठलाचे दर्शन केले आहे. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताई, गोरा कुंभार, चोखा, बंका, नामदेव, जनाबाई हि सर्व संत मंडळी विठ्ठलाची लेकरे होती. विठ्ठल ह्या लेकरांचा आई-बाप झाला होता. आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. आई-बाप जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात त्याप्रमाणे विठ्ठल आपल्या लेकरांची काळजी घेत होता. त्यांच्या संकटाच्या वेळी, अडीअडचणीत धावून जात होता. त्यांच्या हाकेला ओ देत होता. म्हणूनच पुंडलिकाने भिरकावलेल्या विटेवर विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. जनीबरोबर दळण दळत होता. गोरोबाचा चिखल तुडवत होता. दामाजीसाठी महार झाला. नामदेवाच्या हातून जेवण जेवला. एकनाथांच्या घरी पाणी भरत होता. सावता माळीच्या मळ्यात भाजी पिकवत होता. सावता माळी तर आपल्या अभंगात म्हणतो, "कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ।" असा हा देव आपल्या भक्तांच्या घरी सेवा करीत होता. 
                महासमन्वय हे विठ्ठलाचे आणखी एक वेगळेपण आहे कारण त्याचे भक्त हे एकाच जातीचे नसून अठरापगड जातीचे होते. ह्या सर्व भक्तांचे एकच श्रद्धास्थान म्हणजे विठ्ठल. ह्यांच्या भक्तीच्या आड जात, पात, धर्म, पंथ येत नव्हता. विठ्ठलाचे नामस्मरण करणे, त्याच्या भक्तीत तल्लीन होणे हेच या भक्तांना माहित होते. या भक्तांनी आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण केले होते. ह्या सर्व भक्तांचा विठ्ठल श्वास झाला होता. विठ्ठलानेही अपरिमित भक्तीने भारावलेल्या आपल्या भक्तांना दर्शन दिले. सर्व संत वेगवेगळ्या जातीचे असले तरी सर्वांसाठी विठ्ठल हा देव झाला होता. विठ्ठलानेच आपल्या प्रेमाने या सर्वाना एकत्र बांधले होते. भक्तीच्या धाग्याने एकत्र गुंफले होते. विठ्ठलाने हा भक्तांचा समन्वय साधला आहे. 
                जनीने अभंगाच्या शेवटच्या कडव्यात म्हणाले आहे कि, "जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।।" विठ्ठलाचे भक्त हे सर्व जातीचे, धर्माचे असतात. ह्या भक्तांना विठ्ठलाची भक्ती करणे, त्याचे नामस्मरण घेणे हाच धर्म माहित असतो. विठ्ठलापुढे सर्व भक्त एकच असतात. त्यांना ना कुठली जात ना कुठला धर्म असतो. विठ्ठल हाच त्यांचा धर्म असतो व विठ्ठल हीच त्यांची जात असते. म्हणूनच ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताई हि भावंडं ब्राह्मण वर्गातील, गोरा हा कुंभार, सावता हा माळी, बंका हा महार, सेना हा न्हावी, भागू महारीण, गणिकेच्या पोटी जन्मलेली कान्होपात्रा, नामदेव शिंपी, नरहरी सोनार हि सर्व अठरापगड जातीची संत मंडळी विठ्ठलाच्या छत्राखाली एकत्र येत व आपली जात, धर्म विसरून विठ्ठलाच्या भक्तीत, नामस्मरणात तल्लीन होत. ह्या संतांबरोबरच परिसा भागवत, विसोबा खेचर, भानुदास, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई ह्या संतांचा मेळावा पंढरपूरच्या वाळवंटात एकत्र येत होता व विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत होता. हा अठरापगड जातीच्या संतांचा सोहळा म्हणजे एकात्मकतेचे प्रतीक होय. हा सोहळा आषाढी-कार्तिकी एकादशीच्या वेळेस पंढरपुरात पाहायला मिळतो. सर्व संत मंडळी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरापर्यंत येतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात फेर धरतात, फुगड्या खेळतात, आनंदाने नाचतात. विठुरायाच्या नामस्मरणात दंग  होऊन  जातात. हा सोहळा बघून असे वाटते कि जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. हा सोहळा बघून जनी आपल्या अभंगात म्हणते कि, "गोपाळानेच(विठ्ठलानेच) सर्व संतांना एकत्र करून हा सोहळा आरंभला आहे." 




















Comments

Popular posts from this blog

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।

पांडुरंगाच्या भूपाळ्या