आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। 

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। १ ।।
आता दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहें । जो मी तुज पाहें पांडुरंगा ।। २ ।।

अर्थ : हे देवा, तुझे गोजिरे सगुणरूप पाहून माझ्या डोळ्यांस सुख झाले आहे, म्हणून मला हेच रूप आवडते. हे पांडुरंगा, ज्या वेळी मी तुला पाहीन त्यावेळी माझ्या दृष्टीपुढे तू जसा आहेस तसाच कायम रहा.

भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची भक्ती करू लागले, त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊ लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. ते जेथे जातील तेथे विठ्ठल त्यांच्याबरोबर असायचा. त्यांची सावलीही त्यांना विठ्ठलाप्रमाणे भासायची. त्यांना उठता-बसता, जागेपणी, स्वप्नही विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे, कटीवर हात ठेवलेले, कंठी तुळशीमाळा, कंबरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे व मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. अंगावर भरजरी शेला आहे. शेजारी आई रखुमाबाई उभी आहे. असे सगुण श्रीमुख त्यांना दिसत आहे. त्यांना हे रूप पाहून त्यांचे डोळ्यात आनंद दिसत आहे(डोळ्यास सुख प्राप्त झाले आहे). त्यांना विठ्ठलाचे हे रूप आवडायला लागले. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, तू जसा आहेस तसाच माझ्या दृष्टीपुढे रहा. 

लांचावले मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडी ऐसें झालें ।। ३ ।।
तुका म्हणे आम्ही मागते लडिवाळी । पुरवावी आळीं मायबापा ।। ४ ।।

अर्थ : ह्याच रूपाच्या ठिकाणी गोडी लागल्यामुळे माझे मन लाचावले आहे; म्हणून जरी जीव गेला तरी ते सोडू नये असे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लडिवाळांनी हट्ट करून जे काही मागावे ते मायबापांनी पुरविले पाहिजे. 

भावार्थ : तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे सावळे सुंदर, गोजिरे रूप फार आवडू लागले आहे. तुकाराम महाराजांचे मन विठ्ठलावर जडले आहे (लाचावले आहे) म्हणून तर ते सारखे विठ्ठल भक्तीत रमून जातात. विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊन जातात. त्यांना आपल्या जीवापेक्षाही विठ्ठल प्यारा आहे. विठ्ठलाला ते जीव कि प्राण समजतात. ते एवढे विठ्ठलरूप झाले आहेत कि विठ्ठल कोणता व त्यांचा देह कोणता हे सामान्य लोकांना ओळखू येणार नाही. तुकाराम महाराजांच्या मनात अगदी हृदयात विठ्ठलाने आपले स्थान वसवले आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "माझा जीव गेला तरी विठ्ठलाने आपले स्थान सोडू नये."
          तुकाराम महाराज व विठ्ठल यांच्यात वात्सल्याचे नाते निर्माण झाले आहे. विठ्ठलसुद्धा लाडक्या लेकरांप्रमाणे तुकाराम महाराजांकडे पहात आहे. त्यांच्यावर प्रेम करत आहे. तुकाराम महाराजही विठ्ठलाला आपल्या आई-वडिलांसारखे समजत आहेत. म्हणूनच लाडक्या लेकरांनी(लडिवाळांनी) जसा आई-वडिलांकडे हट्ट धरावा तसा तुकाराम महाराज, विठ्ठलाने आपल्या आपल्या दृष्टीपुढे रहावे व आपल्या हृदयातील स्थान सोडू नये असा विठ्ठलाकडे हट्ट धरला आहे व तो हट्ट विठ्ठलाने पुरवला पाहिजे असे तुकाराम महाराजांना वाटत आहे. 
          
 

Comments

Popular posts from this blog

विठो माझा लेकुरवाळा

विठ्ठल हा चित्ती ।